Saturday, May 31, 2014

॥ श्री मारुतिस्तोत्रम् ॥

॥ श्री राम जय राम जय जय राम ॥



श्री मारुति स्तोत्र  हे समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या  स्तोत्रांपैकी एक. मारुतीचे भव्य-दिव्य असे रूप हे स्तोत्र म्हणतांना आपल्यासमोर उभे राहते. साधी सोपी भाषा हे याचे वैशिष्ठ्य असले तरीही क्लिष्ट संस्कृत भाषेतील स्तोत्रांप्रमाणेच हे प्रखर भासते. आपल्या मुलांस हे श्लोक नित्य नेमाने ऐकवावे. हे श्लोक आहेतच इतके साधेपणाने मांडलेले की ती लहान मुले आपोआप तुमच्याबरोबर म्हणू लागतील. आणि काही काळातच त्यांना हे मुखोद्गत होतील. मुले जशी मोठी होतील तसें त्यांना याचा अर्थही सहजरीत्या समजेल. तरीही आपण अथवा एखाद्या जाणकाराने अर्थ समजावून सांगितल्यास उत्तम.

कधी म्हणावे?

खरेतर कधीही.
सकाळी स्नानादिकानंतर अथवा संध्याकाळी दिवेलागणीच्या सुमारास म्हणल्यास उत्तम. या वेळांत म्हणले की मन प्रसन्न होते.

कोणी म्हणावे?

सर्वांनी.
बोलता यायला लागल्यापासून ऐकल्यास दीड ते दोन वर्षाची लहान मुलसुद्धा आरामात म्हणू शकतात.

लागणारा वेळ:

साधारण १०-१५ मिनिटे

*********************

॥ श्री राम जय राम जय जय राम ॥

॥ मारुति स्तोत्र ॥


भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ।
वनारी अन्जनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥

महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें ।
सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका ॥२॥

दीननाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा ।
पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥३॥

लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥४॥

ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें ।
काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें ॥५॥

ब्रह्मांडें माइलीं नेणों आंवाळे दंतपंगती ।
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळें ॥६॥

पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं ।
सुवर्ण कटि कांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥७॥

ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥८॥

कोटिच्या कोटि उड्डाणें झेंपावे उत्तरेकडे ।
मंदाद्रीसारखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥९॥

आणिला मागुतीं नेला आला गेला मनोगती ।
मनासी टाकिलें मागें गतीसी तूळणा नसे ॥१०॥

अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें मेरु- मांदार धाकुटे ॥११॥

ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करूं शके ।
तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥

आरक्त देखिले डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥१३॥

धनधान्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समग्रही ।
पावती रूपविद्यादि स्तोत्रपाठें करूनियां ॥१४॥

भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही ।
नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शनें ॥१५॥

हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली बरी ।
दृढदेहो निःसंदेहो संख्या चंद्रकला गुणें ॥१६॥

रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू ।
रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासती ॥१७॥

॥इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं नाम ॥
॥ श्री मारुतिस्तोत्रम् संपूर्णम् ॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

*********************